Feeds:
Posts
Comments

Archive for May, 2017

 पदार्थ जर भावना असत्या तर शिरा म्हणजे नक्कीच माया! जिव्हाळया शिवाय शिरा होणे नाही. लेकराला मनापासून काही खाऊ घालेवेसे वाटले की कढईत तूप रवाच आलाच समजा. पोरा पासून गाडी सुरू होते पण रवा भाजता भाजता आई असाच आपला लाड करायची ते आठवते, किती वर्षे झाली आईच्या हातचा शिरा खाल्ला नाही म्हणून डोळ्यात टचकन पाणी येते. रवा खरपूस होऊ लागतो आणि भाऊ कसा लालसर पिवळसर शिराच खातो ते आठवतो. अरे , भाऊ तुला कधी खाऊच घातला नाही रे माझ्या हातचा शिरा…सगळी मनातली माया शिऱ्यात शिरत असते ह्या विचारत… रव्याचा सुवास सगळी कडे शिऱ्याची दवंडी फिरवतो..आणि इतक्यातच आपल्या मामीने सात समुद्र जपून आपल्या मुलांसाठी, नातवासाठी आणलेले लाडू आठवतात. मामा ची ‘अरे लाडू घ्या रे’ अशी हाक कशी ह्या आई ला लहान करून गेली ह्याचे अप्रूप वाटते. आपल्या परदेशी वाढणारा लेक आजी कडे हक्काने लाडू वसूल करतो हे पाहुन होणारा आनंद आठवतो..शिऱ्याची गाडी पहा कुठे गेली! म्ह्णूनच कदाचित रवा लालसर झाला की मंद आचेवर ठेवा म्हणत असतील. आठवणीना पण फुरसत हवी ना! पाणी का दूध ह्यावर जरा विचार होतो आणि माझ्या देवांना किती दिवस झाला नेवैद्य नाही म्हणून देवा बद्दलची माया पण असते ह्या शिऱ्यात !! मग येते साखरेची वेळ आणि बाबा कसे गुळाचे गोड जास्त आवडीने खातात ते आठवते. जेव्हा जमेल तेव्हा त्यांच्या साठी गुळाचा शिरा करेन नक्की ही खूणगाठ पक्की होते. साखर जरा मुद्दामहून जास्तीच पडते आणि आपले आजोबा कसे आवडीने अति गोड शिरा आणि लोणचे खायचे ते आठवते. ह्या आठवणींची सगळी माया शिऱ्यात उतरत असते. बदाम पेरले जातात आणि शेवटी नवऱ्याला आवडते म्हणून एक पिकलेले केळ पण. खरं सांगते, काळवंडलेलं केळ घरात आहे ह्याचा आनंद गृहिणी ला फक्त ह्या वेळेसच होतो! 

 असा हा शिरा शेवटी तयार होतो. घरातील अलौकिक घमघमाट काही औरच! जेवढा हा जिव्हाळा तेवढा चविष्ठ हा शिरा! म्हणूनच माझ्या राज्यात शिरा म्हणजे पिढ्यानपिढ्याची अगदी पोटातली माया!

Advertisements

Read Full Post »